
*संविधान दिनी: बेघरांसाठी बँक बचत खाते शिबिराचे आयोजन*
आपली महासत्ता/प्रतिनिधी
मुंबई (दिनांक 27 नोव्हेंबर 2025) स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही आजही शहरी अथवा ग्रामीण भागातील भटके विमुक्त समाजातील नागरिकांना स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार सुद्धा मिळू शकलेले नाहीत. या संविधानिक अधिकारासाठी लागणारे हक्कदारीचे कागदपत्र मुंबई उपनगरातील पारधी समुदायाने मिळवण्यास सुरुवात केली आहे. भारताचे संविधान देशाला समर्पित करून 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्ताने 26 नोव्हेंबर 2025रोजी _ संविधान दिनी “सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी” (सीपीडी) संस्था आणि कॅनरा बँक, मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिकूवाडी बोरिवली येथील पारधी समुदायाच्या वस्तीमध्ये” एकता चौराह ” अभ्यास वर्गामध्ये बँक बचत खाते नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
संविधान दिनाच्या निमित्ताने एकता चौराह अभ्यास वर्गामध्ये कॅनरा बँक अधिकारी कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प आणि संविधान उद्देशिकाचे माहिती पुस्तिका आणि टेबल स्टॅन्ड देऊन स्वागत करण्यात आले. उघड्यावर आणि रस्त्या शेजारी राहणाऱ्या बेघर समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल तो संविधानच मिळवून देईल. बँक बचत खाते मिळाल्यामुळे बचत, विमा सुरक्षा आणि पेन्शन योजनेसारख्या लाभ मिळाल्यामुळे रस्त्यावरील बेघरांचे भविष्य सुकर होईल असे मत क्षेत्रीय अधिकारी शुभम टंडन यांनी सांगितले. 75व्या संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन आणि शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीयकृत कॅनरा बँकेच्या माध्यमातून शुभम टंडन, महाराष्ट्र क्षेत्रीय अधिकारी आणि आतिश कुमार मुंबई क्षेत्रीय अधिकारी यांच्या टीम द्वारे जे बेघर नाल्याच्या शेजारी राहतात त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन 35 लोकांचे जनधन बँक बचत खाते उघडण्यात आले. या शिबिरामध्ये कॅनरा बँकेने बचत खाते उघडले नाही तर या बचत खात्याबरोबर “राष्ट्रीय सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 20 रुपये वार्षिक प्रीमियम वर दोन लाख रुपयाचा विमा आणि “जीवन ज्योती विमा योजना: अंतर्गत वार्षिक 436 रुपये प्रीमियम वर रुपये दोन लाख रुपयांचा विमा सुद्धा या कष्टकरी ,भटके समुदायातील नागरिकांना जोडून देण्यात आल्यामुळे त्याचा सुद्धा लाभ मिळणार आहे.
भटके विमुक्त समाजातील विशेषतः पारधी समाजातील ज्या महिला रस्त्यावर खेळणी, फुगे,फळे,पुस्तके विकून जे काही पैसे मिळवितात, त्यातील पैसे कुठे जमा करायचे ?असा प्रश्न निर्माण होतो अथवा ते पैसे चोरीला जातात. आता या निमित्ताने त्यांना बचतीचा एक चांगला मार्ग सापडला आहे. बचती बरोबर त्यांचा जीवन विमा चा सुद्धा प्रश्न काही अंशी मिटलेला असल्याचे सीपीडी संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर यांनी सांगितले.
या बचत खात्यामुळे आम्हाला लाडकी बहीण सारख्या सरकारच्या योजना पदरात मिळतील अशी अपेक्षा सुद्धा “एकता चौराह चिकूवाडी”चे योगेश बोले, लक्ष्मी पवार,गीता काळे व्यक्त करतात. बँक शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी अल्ताफ शहा , खुशी जयस्वार , प्रेरणा सुर्वे, लक्ष्मण काळे, गंगा पवार यांनी मेहनत घेतली.



