
आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज प्रभाकर पोखरीकर
आंबेडकरी चळवळीचे ख्यातनाम गायक, संगीतकार, “छाती ठोकून सांगू जगाला असा विद्वान होणार नाही..” ह्या गाण्याचे निर्माते,. भीमशाहीर आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज प्रभाकर पोखरीकर याचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र दुखीत झाला. प्रभाकर पोखरीकरांच्या आवाजात जनजागृतीची जिद्द होती. आंबेडकरी स्वाभिमान होता. त्यांनी अनेक गाणी स्वता रचली आणि गायिली. छाती ठोकून सांगू जगाला,असा विद्वान होणार नाही, हे गीत गातांना ते एका ढोपरावर बसून छातीवर जोराने स्वतःचा पंजा मारून गीत सादर करायचे तेव्हा त्यांच्याबरोबर अनेकांच्या नजरा त्यांच्या गाण्यावर खिळून बसायच्या. त्यांच्या आवाजात आणि लिखाणात एक वेगळी शक्ती असायची. आंबेडकरी चळवळीने भारावून गेलाला निधड्या छातीचा चाळवळ्या शरीर रूपाने आपल्यातून निघून गेला पण त्यांच्या दमदार गाण्याने ते अजरामर झाले हे नक्कीच. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ह्या उक्ती प्रमाणे त्यांची कीर्ती महान आहे. बाबासाहेबांची चळवळ त्यांनी समजून घेतली होती. ते कोणत्याही अद्भुत शक्ती किंवा अवतारांना मानत नव्हते. मालाड मालवाणीत राष्ट्र सेवा दलाच्या वतीने कवी संमेलन भरविले जात असे या कवी संमेलनाला प्रभाकर पोखरकर यायचे तेव्हा त्यांना जवळून पाहायला मिळाले. त्या कवी संमेलनात गाणी गातांना देव किंवा ईश्वराचा जेव्हा संदर्भ यायचे तेव्हा त्यांचा काल्पनिक देवाविरुद्धचा राग व्यक्त व्हायचा. असे विज्ञानवादी पोखरकर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत खूप भावनिक व्हायचे. त्यांना ऐकताना उपस्थितीने लक्ष त्यांच्या बोलीतील प्रत्येक शब्दांकडे आकर्षित व्हायचा. त्यांच्या गगनभेदी आवाजामुळे त्यांच्या समोर माईक कमीच पडायचा. त्यांची अनेक गाणी गाजली. लोकांनीही त्यांना उचलून धरले. असा लोकप्रिय, तेजस्वी गायक आपल्यातून हरपला. त्यांना विनम्र अभिवादन करतो.
-चंद्रशेखर सुलभा सुरेश (सुकुमार)
मो. 8879549294